DIKSHA Portal वरील ‘AI Saathi for Educators’ कोर्समध्ये नेमकं काय आहे? जाणून घ्या

By Rohan Miraje - AI + तंत्रज्ञान लेखक
Diksha Portal Ai Saathi For Educators In Marathi

वर्गात उद्या काय शिकवायच याच नियोजन असो, विद्यार्थ्यांसाठी चाचणी तयार करण असो किंवा एखादी अवघड वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगायची असो—आजकाल अनेक शिक्षक ChatGPT किंवा Google Gemini कडे वळताना दिसत आहेत.

पण एआय वापरताना एक गोष्ट वारंवार समोर येते: फक्त एआयला ला एखादा प्रश्न विचारला म्हणून नेहमीच योग्य उत्तर मिळतच अस नाही.

📢 एआय संबंधित नवीन आणि उपयोगी माहितीसाठी Ai Shikshan ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत मध्ये जोडा.

कधी उत्तर खूप लांबलचक असत, कधी विद्यार्थ्यांच्या वयाच्या मानाने फार कठीण असत, तर कधी AI अगदी ठामपणे अशी माहिती सांगून मोकळा होतो जी प्रत्यक्षात अस्तित्वातच नसते. म्हणूनच AI शिकण म्हणजे केवळ एखाद टूल कस वापरायच ते शिकण नाही; योग्य Prompt कसा लिहायचा, AI ने दिलेल उत्तर कस तपासायच आणि वर्गात त्याचा वापर किती नैतिकतेने करायचा, हे समजून घेण अधिक महत्त्वाच आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी ‘AI Saathi for Educators’ (AI Saathi Course) हा पायाभूत प्रशिक्षण कोर्स DIKSHA Portal वर उपलब्ध करण्यात आला आहे. हा कोर्स SCERT महाराष्ट्र आणि Kotak Education Foundation यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला असून, शिक्षकांना AI ची ओळख, Prompting, अध्यापनातील प्रत्यक्ष वापर आणि Responsible AI समजून घेण्यास मदत करतो.

या संपूर्ण गाईडमध्ये आपण AI साथी कोर्स, Prompting चे नियम, प्रगत AI टूल्स आणि नोंदणी प्रक्रिया याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

१. AI Saathi for Educators म्हणजे नेमका काय कोर्स आहे?

सोप्या शब्दांत सांगायच तर, ‘AI साथी’ हा शिक्षकांसाठी तंत्रज्ञानाची भीती घालवणारा आणि दैनंदिन अध्यापनात AI चा योग्य वापर शिकवणारा अधिकृत प्रशिक्षण कोर्स आहे.

कोर्समध्ये पुढील मुख्य घटकांचा समावेश आहे:

पायाभूत संकल्पना: AI म्हणजे काय आणि ते कसे विचार करते?

प्रभावी Prompting: हवे तसे उत्तर मिळवण्यासाठी योग्य सूचना कशा द्याव्यात?

शैक्षणिक साहित्य निर्मिती: Lesson Plans, Assessments, Presentations आणि Videos ची प्राथमिक रूपरेषा कशी आखावी?

जबाबदार आणि सुरक्षित वापर (Responsible AI): विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, गोपनीयता आणि बौद्धिक संपदा सुरक्षित ठेवून AI चा वापर कसा करावा?

२. AI चे उत्तर नेहमी खरे असते का? (AI Hallucination आणि AAA Framework)

ChatGPT किंवा Gemini एखाद्या प्रश्नाच उत्तर अत्यंत आत्मविश्वासाने देतात, त्यामुळे ते बरोबरच असेल असा समज होतो. पण जनरेटिव्ह एआयकडून कधी कधी चुकीची किंवा अस्तित्वात नसलेली माहितीही तयार होऊ शकते. चुकीचे संदर्भ, आकडे, तारीखा किंवा बनावट स्रोत दिले जाण्याची शक्यता असते. याला तांत्रिक भाषेत ‘AI Hallucination असे म्हणतात.

शिक्षकांसाठी हे अत्यंत संवेदनशील आहे, कारण वर्गात चुकीची माहिती गेली तर त्यामुळे विद्यार्थ्यांचे थेट नुकसान होते. म्हणूनच AI च्या उत्तराकडे “अंतिम सत्य” म्हणून न पाहता “फक्त एक कच्चा मसुदा” म्हणून पाहिले पाहिजे.

शिक्षकांसाठी ‘AAA Framework’

AI ने दिलेली माहिती वापरण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न विचारा:

A – Accurate (अचूकता): तारीख, आकडे, शास्त्रीय सूत्रे, इतिहास आणि संदर्भ तपासून पाहिले आहेत का?

A – Appropriate (योग्य पातळी): उत्तराची भाषा आणि मांडणी विद्यार्थ्यांच्या वयाला आणि इयत्तेला साजेशी आहे का?

A – Aligned (उद्दिष्टाशी सुसंगत): आपण जो अभ्यासक्रम शिकवत आहोत आणि जे उद्दिष्ट ठेवले होते, उत्तर त्याच दिशेने आहे का?

नियम सोपा आहे: AI कडून कच्चा मसुदा घ्या ➔ AAA ने तपासा ➔ आवश्यक बदल करा ➔ मगच विद्यार्थ्यांना शिकवा.

३. अचूक उत्तरासाठी: ‘PARTS Framework’ वापरून Prompt कसा लिहावा?

AI ला फक्त “जलचक्र समजावून सांगा” असे विचारले, तर ते ५ पानांचा निबंधवजा मजकूर लिहून देईल. पण जर आपल्याला वर्गासाठी नेमके उत्तर हवे असेल, तर PARTS Framework चा वापर करा:

P – Persona (भूमिका): AI ने कोणती भूमिका घ्यायची ते सांगा.

उदा. “तुम्ही इयत्ता ८वीला शिकवणारे अनुभवी विज्ञान शिक्षक आहात.”

A – Aim (मुख्य कार्य): नेमक काय तयार करायच आहे?

उदा. “जलचक्रावर १० मिनिटांचा छोटा पाठ आराखडा (Lesson Plan) तयार करा.”

R – Recipients (वाचक/विद्यार्थी): हे उत्तर कोणासाठी आहे?

उदा. “हा धडा इयत्ता ८वीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आहे.”

T – Theme (मांडणी आणि टोन): भाषा कशी असावी?

उदा. “भाषा सोपी आणि रोजच्या जगण्यातील उदाहरणांवर आधारित ठेवा.”

S – Structure (स्वरूप): उत्तराची रचना कशी असावी?

उदा. “सुरुवातीला एक प्रश्न, नंतर मुख्य संकल्पना आणि शेवटी ५ सराव प्रश्न द्या.”

परिपूर्ण Prompt चे उदाहरण:

“तुम्ही इयत्ता ८वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे अनुभवी विज्ञान शिक्षक आहात (P). जलचक्र समजावून सांगण्यासाठी १० मिनिटांचा छोटा धडा तयार करा (A). हा धडा मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आहे (R). भाषा सोपी ठेवा आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणे वापरा (T). सुरुवातीला एक कुतूहल निर्माण करणारा प्रश्न, त्यानंतर माहिती आणि शेवटी ५ सराव प्रश्न द्या (S).”

हेही वाचा: शिक्षकांचे वेळ खाऊ काम झटपट होणार? Google NotebookLM ने नेमक काय बदललय, पाहा!.

४. पहिल उत्तर आवडल नाही तर काय कराव? (Follow-up Prompts)

AI शी संवाद साधणे ही एकाच वेळेची प्रक्रिया नसते. पहिल्या उत्तरात मनासारखी मांडणी नसेल, तर नवीन चॅट उघडण्याऐवजी त्याच संवादात खालीलप्रमाणे उप-प्रश्न विचारता येतात:

भाषा सोपी करण्यासाठी: “हेच उत्तर इयत्ता ५वीच्या मुलाला समजेल अशा अगदी सोप्या मराठीत लिहून द्या.”

उदाहरणे जोडण्यासाठी: “यातील कठीण शास्त्रीय शब्द काढा आणि प्रत्येक मुद्द्याला ग्रामीण भागातील साधे उदाहरण जोडा.”

चाचणी तयार करण्यासाठी: “याच धड्यावर आधारित ३ बहुपर्यायी प्रश्न (MCQs) आणि २ विचार करायला लावणारे प्रश्न तयार करा.”

या पद्धतीमुळे एकाच विषयावर टप्प्याटप्प्याने दर्जेदार अभ्याससाहित्य तयार होते.

५. Gemini मधील प्रगत फीचर्सचा अध्यापनात कसा वापर करावा?

Google Gemini मध्ये शिक्षकांचे दैनंदिन काम गतिमान करणारी अनेक आधुनिक टूल्स उपलब्ध आहेत:

Gemini Gems (कस्टमाइज्ड असिस्टंट्स):

दरवेळी भलीमोठी सूचना टाईप करण्याऐवजी विशिष्ट कामासाठी स्वतंत्र Gem बनवता येतो. उदा. ‘Lesson Planner Gem’ किंवा ‘Grammar Helper Gem’. यामध्ये शिक्षकाची पद्धत आधीच सेव्ह केलेली असते.

Gemini Canvas (कार्यक्षेत्र):

धड्याची रूपरेषा, प्रश्नपत्रिका किंवा नोट्स संपादित करण्यासाठी हा स्वतंत्र व्हिज्युअल वर्कस्पेस आहे. यामुळे मुख्य चॅट न बदलता मजकुरात थेट दुरुस्त्या करता येतात.

Deep Research (सखोल संशोधन):

विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प किंवा अहवाल तयार करताना हा पर्याय विविध स्रोतांचा अभ्यास करून सविस्तर माहिती देतो. मात्र, AI ने दिलेल्या संदर्भ लिंक्स शिक्षकांनी स्वतः पडताळून पाहणे गरजेचे आहे.

Guided Learning (मार्गदर्शित शिक्षण):

विद्यार्थ्यांना थेट उत्तर देण्याऐवजी विचार करायला लावणारे उप-प्रश्न विचारण्याची ही पद्धत आहे. उदा. गणितात थेट उत्तर न देता “पहिल्या पायरीवर कोणती क्रिया करावी लागेल?” असा प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त केले जाते.

६. Google NotebookLM: स्वतःच्या अभ्याससामग्रीवर आधारित AI

शिक्षकांकडे एखाद्या धड्याची PDF, नोट्स, Google Docs किंवा इतर अभ्याससामग्री असेल, तर Google NotebookLM त्यावर आधारित अभ्यास करण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

यात PDF, Google Docs, Google Slides, वेबपेज आणि सार्वजनिक YouTube व्हिडिओसारखे sources जोडता येतात. त्यानंतर त्या sources वर प्रश्न विचारून सारांश, अभ्याससाहित्य, प्रश्न किंवा इतर उपयोगी माहिती तयार करून घेता येते. NotebookLM उत्तरांसोबत source citations देखील दाखवू शकते.

उदाहरणार्थ, एखाद्या विज्ञानाच्या धड्याची PDF NotebookLM मध्ये दिल्यानंतर शिक्षक त्यावर आधारित Lesson Plan, सराव प्रश्न, Study Guide किंवा Flashcards तयार करण्यास सांगू शकतात. मात्र AI ने तयार केलेली माहिती आणि citations शिक्षकांनी आवश्यकतेनुसार तपासणे महत्त्वाचे आहे.

७. AI वापरताना शिक्षकांनी पाळावयाची नैतिक मार्गदर्शक तत्त्वे (Responsible AI)

गोपनीयतेचे रक्षण (Data Privacy): विद्यार्थ्यांची वैयक्तिक, संवेदनशील किंवा गोपनीय माहिती AI Tool मध्ये देण्यापूर्वी संबंधित शाळेचे नियम, संस्थेच्या धोरणांचा आणि त्या AI Tool च्या privacy settings चा विचार करा. आवश्यक नसलेली वैयक्तिक माहिती शक्यतो देऊ नका.

अचूकतेची खात्री: शासकीय नियम, कायदे, तारीख आणि आकडेवारी नेहमी अधिकृत सरकारी राजपत्रातून किंवा अधिकृत पाठ्यपुस्तकातून तपासून घ्या.

पक्षपातीपणा टाळणे (Bias): AI च्या उत्तरांमध्ये काही वेळा विशिष्ट सामाजिक किंवा भाषिक कल असू शकतो. वर्गातील सर्व स्तरांतील मुलांचा विचार करून मजकुरात संतुलन ठेवा.

८. DIKSHA वर ‘AI Saathi for Educators’ कोर्स कसा करावा?

हा अधिकृत कोर्स पूर्ण करून शिक्षक आपल्या गुणवत्तेत भर घालू शकतात:

सध्याच्या मुदतवाढीनुसार प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ असून, कोर्स पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ आहे.

प्रशिक्षण श्रेय (CPD Credit): ४ तासांचे अधिकृत प्रशिक्षण मूल्य

प्रमाणपत्र: कोर्समधील निर्धारित मॉड्यूल्स आणि मूल्यमापन चाचणी पूर्ण केल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र उपलब्ध होते.

नोंदणीची सोपी प्रक्रिया:

संगणकावर किंवा स्मार्टफोनवर DIKSHA Portal किंवा ॲप उघडा.

तुमच्या शिक्षक खात्याने Sign In करा.

सर्च बारमध्ये “AI Saathi for Educators”असे शोधा.

कोर्सवर क्लिक करून Enroll या बटनावर टॅप करा.

सर्व व्हिडिओ सत्रे पूर्ण करा, शेवटी दिलेली चाचणी सोडवा आणि अधिकृत प्रमाणपत्र डाउनलोड करून जतन करा.

शिक्षकांसाठी कायम लक्षात ठेवण्याचा सोपा नियम

एआय वापरताना सुरुवातीलाच पाच गोष्टी स्पष्ट करा—भूमिका, काम, विद्यार्थी, भाषा आणि स्वरूप. म्हणजे एआयने कोणाची भूमिका घ्यायची, नेमक काय तयार करायच, ते कोणत्या इयत्तेसाठी आहे, भाषा कशी हवी आणि अंतिम उत्तर कोणत्या स्वरूपात पाहिजे.

आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे, एआयने दिलेलं उत्तर हे अंतिम उत्तर समजू नका. ते तपासा, आपल्या वर्गाच्या गरजेनुसार बदला आणि मगच वापरा.

TAGGED:
Share This Article
AI + तंत्रज्ञान लेखक
Follow:
रोहन मिरजे हे डिजिटल कंटेंट आणि तंत्रज्ञान विषयांवर लेखन करणारे लेखक असून त्यांना डिजिटल क्षेत्रातील १८ वर्षांचा अनुभव आहे. AI, ChatGPT, Google Gemini, AI Tools, AI Prompts आणि AI Photo Editing यांसारख्या विषयांवरील माहिती ते सोप्या आणि समजण्यासारख्या मराठीत मांडतात. AI तंत्रज्ञानाचा शिक्षण, काम आणि दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोग कसा करता येईल, हे महाराष्ट्रातील मराठी वाचकांना समजावून सांगणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.
फॉलो करा