आजच्या काळात ChatGPT, Google Gemini किंवा इतर AI Tools हे शिक्षकांचे जिवलग मित्र बनले आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्यापूर्वी धड्यांची पूर्वतयारी करणे असो, अवघड विषयांवर प्रश्नपत्रिका तयार करणे असो किंवा विद्यार्थ्यांसाठी सोपी आणि रंजक उदाहरणे शोधणे असो—शिक्षक मोठ्या प्रमाणावर एआयचा वापर करत आहेत.
पण इथेच एक सर्वात मोठा आणि चक्रावून टाकणारा प्रश्न उभा राहतो: AI ने दिलेल प्रत्येक उत्तर १००% खर असत का?
📢 एआय संबंधित नवीन आणि उपयोगी माहितीसाठी Ai Shikshan ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत मध्ये जोडा.
तर याचे उत्तर आहे—मुळीच नाही! एआय कितीही हुशार आणि आधुनिक असले तरी ते बऱ्याचदा अशी माहिती देते जी पूर्णपणे खोटी असते. धक्कादायक बाब म्हणजे, एआय ही चुकीची माहिती इतक्या आत्मविश्वासाने मांडते की समोरच्याला ते अगदी खरे वाटते.
या डिजिटल धोक्याला तंत्रज्ञानाच्या भाषेत ‘AI Hallucination’ म्हणतात. महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी दीक्षा (Diksha) पोर्टलवर सुरू असलेल्या ‘Ai Saathi For Educators’ (Google for Education) या अधिकृत प्रशिक्षणातही शिक्षकांना एआयच्या याच मर्यादांबाबत विशेष सावध करण्यात आले आहे.
चला तर मग, एआय नेमका कुठे आणि कसा घोळ घालते, ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया!
एआय चॅटबॉट्स चुकीची माहिती कशी तयार करतात? (३ मुख्य प्रकार)
एआय चॅटबॉट्स (Chatbots) प्रामुख्याने ३ पद्धतींनी चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती तयार करतात:
१. खोटी तथ्ये तयार करणे (Invented Facts)
एआयच्या ट्रेनिंग डेटामध्ये जी माहिती उपलब्ध नसते, ती स्पेस किंवा ‘गॅप्स’ भरून काढण्यासाठी एआय स्वतःच्या मनाने खोटे आकडे, बनावट नावे, चुकीच्या तारखा किंवा काल्पनिक घटना तयार करते. उत्तर वाचताना ते पूर्ण आणि व्यवस्थित वाटते, पण प्रत्यक्षात त्या गोष्टी जगात अस्तित्वातच नसतात.
२. चुकीचा तर्क वापरणे (Faulty Logic / Reasoning)
एआय अनेकदा माहितीची जोडणी करताना चुकीचे लॉजिक वापरते. प्रामुख्याने एआयने मानलेले गृहितक आणि त्याचे पुरावे (Premises and Evidence) यांच्यात ताळमेळ बसत नाही. बऱ्याचदा एआय स्वतःच्याच उत्तरामध्ये स्वतःच्या युक्तिवादाच्या विरोधाभासी विधाने करते, ज्यामुळे गणित, विज्ञान किंवा भूगोलाच्या पायऱ्या पूर्णपणे चुकतात.
३. बनावट संदर्भ देणे (Fake Citations)
जेव्हा आपण एआयला एखाद्या माहितीचा पुरावा किंवा ‘Source’ मागतो, तेव्हा ते स्वतःच्या मनाने काल्पनिक पुस्तक, अस्तित्वात नसलेले लेखक, बनावट शोधनिबंध (Research Papers) किंवा खोट्या वेबसाईट्सचे संदर्भ तयार करून देते. शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात हा सर्वात मोठा गंभीर धोका मानला जातो.
हेही वाचा: AI मुळे जगाचा अंत होणार? अनियंत्रित AIला थांबवण्यासाठी आले ‘किल स्विच’; जाणून घ्या काय आहे?.
उपाय: शिक्षकांसाठी ‘AAA’ चा मॅजिक फॉर्म्युला!
एआयच्या या खोट्या किंवा ‘Hallucinated’ उत्तरांपासून वाचण्यासाठी गुगलने शिक्षकांना ‘AAA Framework’ वापरण्याचा सल्ला दिला आहे. एआयने दिलेले उत्तर वर्गात नेण्यापूर्वी स्वतःला हे ३ प्रश्न नक्की विचारा:
- A – Accurate (माहिती अचूक आहे का?): एआयने दिलेल्या उत्तरात काही तथ्यात्मक त्रुटी किंवा चुकीची माहिती आहे का? त्यातील आकडे आणि नावे तुम्ही विश्वसनीय स्रोतांकडून (Double Check) तपासून पाहिली आहेत का?
- A – Appropriate (उत्तर योग्य आहे का?): हे उत्तर तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या वयासाठी, त्यांच्या शैक्षणिक पातळीसाठी आणि आपल्या नैतिक व सामाजिक मूल्यांसाठी (Educational/Ethical Norms) योग्य आहे का? भाषा जास्त कठीण तर नाही ना?
- A – Aligned (उत्तर उद्दिष्टांशी जुळते का?): एआयने तुम्ही दिलेल्या ‘Prompt’ किंवा कामाशी सुसंगत उत्तर दिले आहे का? ते मूळ विषयाला सोडून भलतीकडेच तर गेले नाही ना? तसेच हे उत्तर आपल्या शैक्षणिक धोरणांशी सुसंगत आहे का?
शिक्षकांसाठी प्रॅक्टिकल टिप्स
एआय वापरताना शिक्षकांनी केवळ उत्तरावर आंधळा विश्वास न ठेवता खालील गोष्टी आवर्जून कराव्यात:
- Follow-up Questions विचारा: एआयच्या माहितीमध्ये सातत्य (Consistency) आहे का हे तपासण्यासाठी त्याला त्याच विषयावर क्रॉस-व्हेरिफाय करणारे उलट प्रश्न विचारा.
- डबल-चेक प्रॉम्ट वापरा: एआयला उत्तर दिल्यानंतर “Are you sure about this source?” किंवा “Verify this information” असे सांगून माहितीची पुन्हा खात्री करून घ्या.
- पायऱ्या तपासा: एआयने दिलेल्या थेट उत्तरावर विश्वास न ठेवता, त्यामागची प्रक्रिया आणि मूळ संदर्भ उघडून पाहण्याची सवय ठेवा.
हे विसरू नका: एआयला नेहमी रोल (Role) द्या: प्रॉम्ट लिहिताना नेहमी सुरुवात अशी करा: “You are an experienced teacher of 10th grade Marathi medium students and…” यामुळे एआय विद्यार्थ्यांच्या वयाला आणि पातळीला योग्य असेच उत्तर देईल.
AI शिक्षकांची जागा घेणार की मदत करणार?
या सर्व मर्यादा पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की, AI हा कधीही खऱ्या शिक्षकांचा पर्याय असू शकत नाही.
शिक्षकांकडे विषयाच्या ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांची मानसिक समज, वर्गातील परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी भावना व आपुलकी असते, ज्या मशीनकडे कधीच येऊ शकत नाहीत. एआय केवळ माहिती तयार करणारा एक पहिला कच्चा मसुदा (First Draft) असू शकतो; पण तो मसुदा वर्गात प्रत्यक्ष शिकवण्यायोग्य आहे की नाही, याचे परीक्षण करण्याची अंतिम जबाबदारी नेहमी शिक्षकाचीच राहील!



