Ai आपली वऱ्हाडी किंवा मालवणी बोलणार? महाराष्ट्राच्या नव्या AI प्लॅनमुळे गेम कसा बदलणार, पाहा!

By Rohan Miraje - AI + तंत्रज्ञान लेखक
Maharashtra Ai Policy 2026 Mahachatur Ai Chatbot News

कधी मोबाईलवर ChatGPT किंवा Gemini उघडून अगदी आपल्या रोजच्या बोली भाषेत, Ai ला काही विचारून पाहिलय का?

समोरून आलेल उत्तर वाचताना किंवा ऐकताना अनेकदा एक गोष्ट जाणवते—भाषा मराठी असते, पण बोलण्याची पद्धत मात्र आपली वाटत नाही. एखादा स्थानिक शब्द, म्हण किंवा बोलीभाषेतील वाक्य वापरल की AI ला त्याचा नेमका संदर्भ समजेलच अस नाही.

📢 एआय संबंधित नवीन आणि उपयोगी माहितीसाठी Ai Shikshan ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत मध्ये जोडा.

यामागे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. AI सिस्टीमला एखादी भाषा चांगल्या प्रकारे समजण्यासाठी फक्त त्या भाषेचा शब्दकोश पुरेसा नसतो. त्या भाषेत लोक प्रत्यक्षात कसे बोलतात, कोणत्या भागात कोणते शब्द वापरतात, स्थानिक संदर्भ काय आहेत, हे समजण्यासाठी मोठ्या प्रमाणात दर्जेदार लोकल डेटा लागतो.

आणि याच ठिकाणी महाराष्ट्राच्या नवीन AI धोरणातील एक महत्त्वाची गोष्ट लक्ष वेधून घेते.

महाराष्ट्र सरकारच्या AI Policy-2026 मध्ये मराठीसोबत प्रादेशिक बोली आणि आदिवासी भाषांसाठी डेटासेट तयार करण्याचा उल्लेख आहे. त्यासाठी State AI Data Exchange उभारण्याचीही योजना आहे. म्हणजेच AI साठी महाराष्ट्रातील स्थानिक भाषांचा डेटा अधिक व्यवस्थित पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

हे ऐकायला थोड तांत्रिक वाटत. पण त्याचा सामान्य माणसाला काय फायदा होऊ शकतो, हे जास्त महत्त्वाच आहे.

उदाहरणार्थ, उद्या कोकणातला एखादा शेतकरी आपल्या स्थानिक बोलीत आंब्याच्या पिकाबद्दल Ai ला प्रश्न विचारतो किंवा विदर्भातला शेतकरी वऱ्हाडी भाषेत सोयाबीनवरील किडीबद्दल माहिती विचारतो, तर स्थानिक भाषेचा अधिक चांगला डेटा उपलब्ध असल्यास भविष्यातील AI प्रणालींना अशा प्रश्नांचा संदर्भ समजून घेण्यास मदत होऊ शकते.

शिक्षणाच्या बाबतीतही याचा मोठा उपयोग होऊ शकतो. मराठी माध्यमातील एखाद्या विद्यार्थ्याला विज्ञान किंवा गणितातील अवघड संकल्पना समजून घ्यायची असेल, तर भविष्यात अधिक स्थानिक संदर्भ आणि मराठीतील दर्जेदार शैक्षणिक डेटा असलेली AI साधने त्याला विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी वापरता येऊ शकतात.

सरकारी सेवांमध्येही असाच बदल दिसू शकतो. एखाद्या सरकारी योजनेचा सरकारी आदेश वाचण्याऐवजी, नागरिकाने साध्या भाषेत प्रश्न विचारावा आणि AI ने त्याला आवश्यक माहिती समजण्यास सोप्या पद्धतीने सांगावी, अशी सेवा भविष्यात विकसित होऊ शकते. अर्थात, अशा प्रणालींमध्ये माहितीची अचूकता, सरकारी डेटाची अद्ययावतता आणि नागरिकांच्या गोपनीयतेची काळजी हे तितकेच महत्त्वाचे मुद्दे असतील.

हेही वाचा: Google Gemini च्या ‘या’ ३ ट्रिक्समुळे शिक्षकांचा वेळ वाचणार; कामाचा ताण होईल अर्धा!.

महाराष्ट्राच्या AI धोरणाचा विषय फक्त भाषेपुरता मर्यादित नाही. धोरणात ₹10,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक, 2031 पर्यंत 1.5 लाखांहून अधिक रोजगार आणि दोन लाख तरुण व व्यावसायिकांना AI प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य आहे. तसेच किमान 2,000 GPU क्षमतेची सुविधा आणि AI साठी स्टार्टअप्सना मदत करण्याच्या तरतुदीही आहेत.

याच दिशेने महाराष्ट्रात MahaChatur AI चॅटबॉटही सुरू करण्यात आला आहे. हा प्लॅटफॉर्म कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, अप्रेंटिसशिप आणि करिअर मार्गदर्शनासाठी वापरण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. 

पण स्थानिक बोलीभाषांचा AI तयार करण हे फक्त शब्द गोळा करण्याइतक सोप काम नाही. गावागावात बोलली जाणारी भाषा, वेगवेगळे उच्चार, स्थानिक शब्द, म्हणी आणि त्यांचा संदर्भ व्यवस्थित नोंदवावा लागेल. त्याचबरोबर हा डेटा कोणाचा आहे, तो कशासाठी वापरला जाणार आहे आणि लोकांच्या गोपनीयतेच संरक्षण कस होणार, हेही महत्त्वाचे प्रश्न आहेत.

म्हणून महाराष्ट्राच्या AI प्लॅनचा खरा परिणाम फक्त ₹10,000 कोटींच्या गुंतवणुकीत किंवा हजारो GPU मध्ये दिसणार नाही. आपल्या भाषेला आणि स्थानिक गरजांना AI किती चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो, हेही तितकंच महत्त्वाच ठरणार आहे.

आज आपल्याला AI शी संवाद साधताना अनेकदा त्याच्या भाषेच्या चौकटीत प्रश्न विचारावा लागतो. भविष्यात स्थानिक भाषांचा दर्जेदार डेटा आणि योग्य तंत्रज्ञान एकत्र आल, तर परिस्थिती बदलू शकते—AI ला आपल्या भाषेत प्रश्न विचारण्यासाठी आपण भाषा बदलण्याऐवजी, AI आपली भाषा आणि संदर्भ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो.

आणि मग प्रश्न फक्त “Ai ला वऱ्हाडी किंवा मालवणी समजेल का?” एवढाच राहणार नाही. प्रश्न असा असेल—AI आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाशी आपल्या भाषेत किती नैसर्गिकपणे संवाद साधू शकतो?

हेही वाचा: आता AI ला चेहरा भाड्याने देता येणार? सुरू झाला कमाईचा नवा मार्ग; मिळू शकतात लाखो रुपये!.

TAGGED:
Share This Article
AI + तंत्रज्ञान लेखक
Follow:
रोहन मिरजे हे डिजिटल कंटेंट आणि तंत्रज्ञान विषयांवर लेखन करणारे लेखक असून त्यांना डिजिटल क्षेत्रातील १८ वर्षांचा अनुभव आहे. AI, ChatGPT, Google Gemini, AI Tools, AI Prompts आणि AI Photo Editing यांसारख्या विषयांवरील माहिती ते सोप्या आणि समजण्यासारख्या मराठीत मांडतात. AI तंत्रज्ञानाचा शिक्षण, काम आणि दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोग कसा करता येईल, हे महाराष्ट्रातील मराठी वाचकांना समजावून सांगणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.
फॉलो करा