आतापर्यंत सामान्य माणसासाठी ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजे केवळ निबंध लिहून देणे, फोटो बनवणे किंवा प्रश्नांची पटापट उत्तरे देणे इतकेच होते. मात्र, जगातील आघाडीची AI कंपनी OpenAI ने असा एक चमत्कार करून दाखवला आहे, ज्याची संपूर्ण जागतिक विज्ञान जगतात चर्चा सुरु आहे.
कंपनीने आपल्या प्रगत अंतर्गत AI मॉडेलच्या (Internal Frontier Model) मदतीने उच्च पातळीवरील कठीण गणिते सोडवून ७२२ संशोधन लेख (Mathematical Manuscripts) एका झटक्यात जगभरातील संशोधकांसाठी खुले (Open Source) केले आहेत. AI आता केवळ भाषा किंवा चित्रकलेपुरता मर्यादित राहिला नसून, मानवाच्या बुद्धिमत्तेचा कस पाहणाऱ्या गणितीय संशोधनात स्वतःचे पाय रोवत असल्याचे हे सर्वात मोठे आणि जिवंत उदाहरण मानले जात आहे.
📢 एआय संबंधित नवीन आणि उपयोगी माहितीसाठी Ai Shikshan ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत मध्ये जोडा.
नेमका काय आहे हा गणिताचा खजिना?
OpenAI ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, कंपनीने गणितातील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि न सुटलेल्या सुमारे ४,००० कठीण समस्यांवर आपल्या अत्याधुनिक AI मॉडेलला विचार करण्यास लावले होते. त्यातून AI ने अत्यंत हुशारीने शोधून काढलेले निकाल ३७२ संशोधन कुटुंबांमध्ये (Result Families) आणि ७२२ पेपर्समध्ये मांडून GitHub वर सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहेत.
विशेष म्हणजे, हे काम कंपनीने एकट्याने बंद खोलीत केलेले नाही. अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी’शी (IAS) संबंधित दिग्गज गणितज्ञांच्या एका सल्लागार समितीसोबत मिळून हे निकाल अधिकृतपणे सार्वजनिक करण्यात आले आहेत.
‘Lean’ तंत्रज्ञान म्हणजे काय आणि ते एवढे महत्त्वाचे का?
गणितात केवळ ‘मी हे गणित सोडवल’ अस म्हणून चालत नाही, तर त्या उत्तराची प्रत्येक पायरी (Proof) अचूक आहे की नाही, हे सिद्ध कराव लागत. अनेकदा मानवी मेंदूकडून अशा मोठ्या सिद्धता तपासताना चुका होतात.
यावर मात करण्यासाठी OpenAI ने यातील बहुतांश गणितीय निष्कर्षांसाठी ‘Lean’ (लीन) नावाच्या विशेष प्रोग्रामिंग भाषेचा वापर केला आहे.
सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘Lean’ हे असे सॉफ्टवेअर आहे जे कॉम्प्युटरच्या मदतीने AI ने मांडलेली प्रत्येक गणितीय पायरी तंतोतंत खरी आहे की नाही, हे सेकंदाच्या आत चेक करते. AI ने एखादा नवा तर्क मांडायचा आणि कॉम्प्युटरने त्याची कायदेशीर तपासणी करायची, या जोडगोळीमुळे विज्ञानाला एक नवा, अचूक डिजिटल सहकारी मिळाला आहे.
एका गणितासाठी तीन-तीन तास विचार!
ChatGPT वापरताना आपण प्रश्न विचारला की दोन सेकंदात उत्तर समोर येते. पण गणिताचे प्रश्न सोडवताना OpenAI च्या या सुपर-मॉडेलने तब्बल तीन-तीन तास अखंड ‘थिंकिंग कॉम्प्युट’ (विचार करण्याची डिजिटल शक्ती) वापरली आहे.
माणूस जसा कठीण गणितावर डोके खाजवत तासनतास विचार करतो, वेगवेगळ्या शक्यता तपासतो आणि मग उत्तरापर्यंत पोहोचतो; अगदी तशीच ‘रीझनिंग’ (Reasoning) पद्धत या AI मॉडेलने वापरली आहे.
म्हणजे AI ने माणसाला मागे टाकले का? शास्त्रज्ञांची गरज संपली?
अजिबात नाही! हा या बातमीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे.
सोशल मीडियावर “AI ने ७२२ शोध लावले आणि शास्त्रज्ञ बेकार झाले” असा अतिरंजित डांगोरा पिटला जात असला, तरी वास्तवात हे निकाल म्हणजे ‘अंतिम शोध’ नव्हेत, तर संशोधनाची एक मजबूत दिशा आहेत. यातील सर्व पेपर्स अजून अंतिम पडताळणीच्या टप्प्यावर पोहोचलेले नाहीत.
AI ने कच्चा माल तयार करून दिला आहे, पण त्याचा खरा अर्थ काय, त्यातून विज्ञानाला काय फायदा होणार आणि ते प्रत्यक्षात कसे वापरायचे, हे ठरवण्यासाठी मानवी मेंदूची आणि शास्त्रज्ञांची गरज कायम राहणार आहे.
सर्वसामान्य माणसाला याचा काय फायदा होणार?
गणिताचा थेट संबंध आपल्या रोजच्या जगण्याशी असतो. जेव्हा गणितातील कठीण समीकरणे सुटतात, तेव्हाच:
- कर्करोग आणि दुर्धर आजारांवर नवी औषधे शोधणे सोपे होते,
- अंतराळ मोहिमांसाठी अचूक रॉकेट डिझाइन करता येतात,
- हवामान बदलाचा अंदाज अचूक बांधता येतो,
- आणि सायबर सुरक्षेचे अभेद्य कोड तयार करता येतात.
OpenAI च्या या पाऊलामुळे भविष्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रात अशक्य वाटणारे शोध अवघ्या काही महिन्यांत लागण्याची नवी आशा निर्माण झाली आहे.
विज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात!
OpenAI ने गणित जगतासाठी आता मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा आणि कार्यशाळांचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. “AI फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे साधन राहिले नसून ते मानवी ज्ञानाची कक्षा रुंदावणारे वैज्ञानिक साधन बनले आहे,” हेच या ७२२ पेपर्सच्या ऐतिहासिक प्रकाशनाने जगाला दाखवून दिले आहे!
